
दिव्यांग व्यक्तींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत त्यांच्यातील कौशल्य आणि आत्मविश्वासाला व्यासपीठ देणारा ‘मिट्टी कॅफे’ हा सामाजिक समावेशकतेचा प्रेरणादायी उपक्रम असल्याचे प्रतिपादन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले.

दिव्यांग व्यक्तींना आर्थिक स्वावलंबन आणि सन्मानाने जगण्याची संधी मिळावी या उद्देशाने मुंबईतील ओबेरॉय स्कायसिटी मॉल येथे सुरु केलेल्या ‘मिट्टी कॅफे’चे उद्घाटन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार अतुल भातखळकर, उत्तर प्रदेश विधानसभेचे माजी आमदार सुभाष पासी, ज्येष्ठ पत्रकार कुमार राकेश, मिट्टी कॅफेच्या संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी अलिना आलम, स्कायसिटी मॉलचे प्रतिनिधी तसेच ‘प्रोजेक्ट मुंबई’चे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी शिशिर जोशी उपस्थित होते. यावेळी मिट्टी कॅफेमध्ये कार्यरत दिव्यांग सदस्यांचे पालकही उपस्थित होते.
दिव्यांग व्यक्तींच्या काम करण्याच्या पद्धतीपेक्षा त्यांच्यातील क्षमता, कामाप्रती असलेली निष्ठा आणि समर्पण यांना महत्त्व दिले पाहिजे. दिव्यांग व्यक्तींना समाजाच्या मुख्य प्रवाहात सहभागी करून घेणे, त्यांना रोजगार उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या कार्याचा सन्मान करणे आवश्यक आहे, असे राज्यपालांनी यावेळी अधोरेखित केले.