
केंद्रीय संस्कृती व पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे झालेल्या समारंभात सन २०२४ आणि २०२५ या वर्षांसाठी देशभरातील एकूण १०६ युवा कलावंतांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. उस्ताद बिस्मिल्ला खाँ युवा पुरस्कार’अंतर्गत २५ हजार रुपये रोख, ताम्रपट आणि अंगवस्त्र देऊन कलावंतांचा सन्मान करण्यात येतो. युवा प्रतिभेला प्रोत्साहन देणे, पारंपरिक कलांचे जतन व संवर्धन करणे आणि भारतीय कला-संस्कृतीचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे हा या पुरस्कारांचा प्रमुख उद्देश आहे.
हिंदुस्तानी शास्त्रीय गायनातील योगदानाबद्दल कृष्ण बोंगाने आणि अंकिता जोशी यांना सन २०२४ चा संयुक्त युवा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पारंपरिक ‘बहुरूपी भारूड’ या लोककलाप्रकाराच्या संवर्धनासाठी डॉ. भावार्थ रामचंद्र देखणे यांना तर, पारंपरिक कलासूत्री बाहुलीनाट्य कलेच्या जतन व संवर्धनासाठी बालकृष्ण (कृष्णा) गणपत मसगे यांना सन २०२४ चा युवा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सन २०२५ च्या पुरस्कारांमध्ये हार्मोनियम वादनातील योगदानाबद्दल तन्मय देवचके, तर शाहिरी, पोवाडा आणि लोकगीतांचा अभ्यास, संशोधन व प्रसार यांसाठी प्रवीण प्रताप जाधव यांचा सन्मान करण्यात आला. तन्मय देवचके हे पुरस्कार वितरण समारंभास उपस्थित नव्हते.