
विविध भागांतील पुनर्विकासाचे प्रस्ताव मार्गी लावताना रहिवाशांचे हित, संबंधित विभागांच्या भूमिका आणि आवश्यक प्रशासकीय कार्यवाही यांचा समन्वय साधणे महत्वाचे आहे. या पार्श्वभूमीवर सर्व इमारतींच्या पुनर्विकासाचे प्रस्ताव गतीने मार्गी लावावेत, असे निर्देश उपसभापती अहिर यांनी दिले.
विधानभवन येथे झालेल्या आढावा बैठकीस पिंपळेश्वर, इराणी चाळ व वाणी चाळ; सातरस्ता-जेकब सर्कल, धोबी घाट परिसरातील विविध इमारती; उमरखाडीतील म्हाडाच्या ८१ व परिसरातील खासगी इमारती; तसेच परळ-प्रभादेवी येथील जगन्नाथ भाटणकर मार्गावरील रस्तारुंदीमुळे बाधित झालेल्या १९ इमारतींच्या समूह पुनर्विकासाच्या प्रस्तावांवर तपशीलवार चर्चा करण्यात आली.
बैठकीत संबंधित इमारतींचे रहिवासी व पदाधिकाऱ्यांनी पुनर्विकासासंदर्भातील आपल्या अपेक्षा, अडचणी आणि विविध प्रश्न मांडले. उपसभापती अहिर यांनी रहिवासी व पदाधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतानाच म्हाडा आणि अन्य संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांची बाजूही जाणून घेतली.