
डिजिटलायझेशनच्या युगात कृत्रिमबुद्धिमत्ता (एआय), रोबोटिक्स आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा शिक्षणातील वापर वाढत आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार शहरी भागासह ग्रामीण आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांपर्यंत जागतिक दर्जाचे आधुनिक शिक्षण पोहोचविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाच्या समान संधी मिळण्यासाठी जागतिक स्तरावरील अभ्यासक्रम भारतीय भाषांमध्ये अनुवादित करून सोप्या स्वरूपात उपलब्ध करण्याबाबत विचार होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले.
शिक्षण क्षेत्रातील नव्या संकल्पना, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि शैक्षणिक विकासाच्या विविध पैलूंवर या उपक्रमात विचारमंथन होत आहे. या चर्चासत्रातून पुढे येणाऱ्या सूचना आणि निष्कर्षांचा राज्याच्या प्रस्तावित बालधोरणात समावेश करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे मंत्री तटकरे यांनी सांगितले.

डिजिटल शिक्षणासाठी शाळांमध्ये डिजिटल बोर्ड बसविण्याबरोबरच शिक्षकांना त्यांचा प्रभावी वापर करता यावा, यासाठी किमान दोन दिवसांचे (४८ तासांचे) प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांप्रमाणेच शिक्षकांचे मानसिक आरोग्य आणि कल्याणही महत्वाचे आहे. विद्यार्थी, शिक्षक आणि शाळा व्यवस्थापनाच्या अडचणींचा एकत्रित विचार करून त्या सोडविण्यात येणार असल्याचे मंत्री आदिती तटकरे यांनी यावेळी सांगितले.