
शहराच्या वाहतूक व्यवस्थेला नवी दिशा देणाऱ्या आणि उत्तर, मध्य व दक्षिण नागपूरला अधिक सक्षमपणे जोडणाऱ्या या पुलाचे नामकरण डॉ. केशव बळीरामपंत हेडगेवार, उड्डाणपूल असे करण्यात आले. पायाभूत सुविधांच्या माध्यमातून नागपूरला सुव्यवस्थित शहराचे स्वरुप देण्याचा प्रयत्न होत असून शहराच्या भविष्यातील विस्ताराच्या दृष्टीने देखील व्यापक प्रमाणात प्रकल्प हाती घेण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. सुमारे ९९८ कोटी रुपयांच्या ८.९० किलोमीटरच्या या उड्डाणपुलासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून हा उड्डाणपूल साकारण्यात आला असून तो विक्रमी वेळेत पूर्ण झाला आहे. यामुळे शहराच्या व्यापक भागातील वाहतुकीची समस्या सुटण्यास मदत होईल. हा उड्डाणपूल अभियांत्रिकीचा सर्वोत्तम नमूना आहे. नागपूर शहरात आतापर्यंत ३५ उड्डाणपूल झाले आहेत, तर १५ प्रस्तावित आहेत. कचऱ्यापासून ऊर्जानिर्मितीचा पर्यावरणपूरक आधुनिक प्रकल्प साकारला जात आहे. सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांमुळे शहरातील खड्ड्यांचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटला आहे. बाह्य रिंगरोडचे काम पूर्ण झाल्यावर आता भविष्यात शहराचा होणारा विस्तार लक्षात घेऊन आणखी एक रिंगरोड तयार केला जाणार आहे. सुमारे २ हजार एकर क्षेत्रात रोजगार केंद्रित असे नवीन नागपूर विकसित करण्याचे नियोजन आहे. नागपूरकडे आधुनिक आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर म्हणून पाहिले जात आहे. एक शाश्वत शहर म्हणून नागपूरचा विकास करण्याचा आमचा प्रयत्न आहे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपुरातील हा सर्वोत्तम उड्डाणपूल असून त्यात सर्वोत्तम अशा आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञानाचा वापर झाला आहे. यामुळे वाहतूक कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणात सुटणार असून अंतर तसेच वाहतुकीला लागणारा वेळही मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. आगामी काळातही शहरात पायाभूत सुविधांचे प्रकल्प व्यापक प्रमाणात राबविले जाणार आहेत – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

कार्यक्रमास पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नीता ठाकरे, उपमहापौर लीला हाथीबेड, आमदार सर्वश्री प्रवीण दटके, मोहन मते, कृष्णा खोपडे, संजय भेंडे, माजी खासदार डॉ. विकास महात्मे, माजी खासदार गेव्ह आवारी, माजी महापौर दयाशंकर तिवारी यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.