
स्वीडनच्या राजदूत पेट्रा मेनांडर यांनी सह्याद्री अतिथिगृह येथे मंत्री रावल यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी महाराष्ट्र व स्वीडन यांच्यातील औद्योगिक गुंतवणूक, संरक्षण उत्पादन, एरोस्पेस, कृत्रिम बुद्धिमत्ता, कृषी आणि दुग्धव्यवसाय क्षेत्रांतील सहकार्याबाबत चर्चा झाली. पुणे ते नाशिकदरम्यान स्वीडिश कंपन्यांसाठी औद्योगिक समूह विकसित करणे, तसेच आवश्यक पायाभूत सुविधा व निवासव्यवस्था उपलब्ध करून देण्याच्या शक्यतेवरही विचारविनिमय करण्यात आला.
स्वीडनच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा महाराष्ट्रातील उद्योगांमध्ये वापर वाढविणे, कौशल्य व तंत्रज्ञान हस्तांतरणातून स्थानिक उत्पादन क्षमता आणि मूल्यवर्धनाला चालना देणे, तसेच आधुनिक दुग्धव्यवसाय तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांना लाभ मिळवून देणे यावर भर देण्यात आला. दोन्ही देशांतील विद्यार्थी, संशोधक व शेतकऱ्यांमध्ये अनुभवांची देवाणघेवाण वाढवून औद्योगिक सहकार्य, गुंतवणूक आणि सांस्कृतिक संबंध अधिक दृढ करण्यावर यावेळी चर्चा झाली.