
नागरिकांना आपल्या कुटुंबातील परंपरा, गणेशोत्सवाच्या आठवणी, लोककला आणि सांस्कृतिक ठेवा या व्यासपीठावर नोंदवून महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा जगापर्यंत पोहोचविण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
‘बाप्पा फक्त दहा दिवसांचा नाही. वर्षाचे ३६५ दिवस, घरोघरी बाप्पा’ हा या मोहिमेचा मुख्य संदेश आहे. प्रत्येक घर, कुटुंब, गणेश मंडळ, मंदिर आणि समाजसमूहाशी जोडलेल्या गणेश परंपरांची नोंद करून हा वारसा पुढील पिढ्यांसाठी जतन करण्यावर या उपक्रमाचा भर आहे.
या मोहिमेत नागरिकांना सहज सहभागी होता यावे, यासाठी व्हॉट्सॲपच्या माध्यमातूनही कथा नोंदविण्याची सुविधा देण्यात आली आहे. नागरिकांनी +९१ ९१३६१ ७२६८१ या व्हॉट्सॲप क्रमांकावर ‘BAPPA’ असा संदेश टाइप करून आपल्या घरातील एखादी परंपरा, आठवण किंवा गणेशोत्सवाशी संबंधित गोष्ट सांगावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी नागरिकांना या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक घरातील गणेश परंपरा, प्रत्येक मंडळाचा इतिहास आणि प्रत्येक कलाकाराची कला यांची नोंद करून हा सांस्कृतिक ठेवा पुढील पिढ्यांसाठी जतन करण्याच्या उद्देशाने नागरिकांनी ‘Bappa.org’ या व्यासपीठाचा उपयोग करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.