
ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्सचे (जीसीसी) प्रमुख केंद्र म्हणून पुणे वेगाने विकसित होत असून, पुण्यात आतापर्यंत १३० पेक्षा अधिक जीसीसी कार्यरत झाले आहेत. आगामी एका वर्षात ही संख्या ८०० हून अधिक होईल, असा विश्वास करत जीसीसी क्षेत्रात पुण्याने देशात प्रथम क्रमांकाचे स्थान मिळवावे, हे राज्य शासनाचे लक्ष्य असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

महाराष्ट्र हे ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्ससाठी देशातील प्रमुख आणि पसंतीचे गुंतवणूक केंद्र बनले आहे. मॅग्नमचे पुण्यातील केंद्र एक हजारांहून अधिक रोजगाराच्या संधी निर्माण करणार आहे. त्यासोबतच अप्रत्यक्ष रोजगारालाही चालना मिळणार आहे. कंपनीच्या जागतिक व्यवसाय प्रक्रिया अधिक सक्षम करण्यासाठी या केंद्रात कृत्रिम बुद्धिमत्ता, स्वयंचलित तंत्रज्ञान, लॉजिस्टिक्स आणि अन्य आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. उत्पादन, वितरण आणि ग्राहक अनुभवाशी संबंधित प्रक्रिया अधिक प्रभावी करण्यासाठी या तंत्रज्ञानाचा उपयोग होईल. राज्यात गुंतवणूक करणाऱ्या उद्योगांना आवश्यक ते सहकार्य आणि अनुकूल वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. मुंबईतील प्रादेशिक मुख्यालयासोबत पुण्यात सुरू झालेले हे ग्लोबल बिझनेस सोल्युशन्स सेंटर मॅग्नमच्या महाराष्ट्रातील विस्ताराला नवी दिशा देणारे ठरेल. पुण्यातील औद्योगिक क्षेत्रात पायाभूत सुविधा अधिक सक्षम करून ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्ससाठी आणखी आकर्षक केंद्र बनविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. हिंजवडीसह पुण्यातील आयटी क्षेत्राशी संबंधित पायाभूत सुविधांचे प्रश्न सोडविण्यावर शासनाचे विशेष लक्ष आहे. उद्योग आणि गुंतवणुकीसाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्याच्या शासनाच्या प्रयत्नांना उद्योग क्षेत्राकडून मिळणारा सकारात्मक प्रतिसाद ही त्याचीच परिणती आहे. गुंतवणुकीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती करण्यास शासनाचे प्राधान्य आहे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कार्यक्रमास आमदार अमित गोरखे, शंकर जगताप, उद्योग, गुंतवणूक व सेवा विभागाचे प्रधान सचिव डॉ. पी. अनबलगन, मुख्यमंत्र्यांचे गुंतवणूक व धोरण सल्लागार कौस्तुभ धवसे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त विजय सूर्यवंशी, मॅग्नम आईस्क्रीम कंपनीचे मुख्य वित्तीय अधिकारी अभिजीत भट्टाचार्य आदी उपस्थित होते.