
पदविका अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना दर्जेदार डिजिटल अध्ययन साहित्य उपलब्ध करून देण्यासह त्यांच्या सर्वांगीण विकासाला आणि रोजगार क्षमतेला चालना देण्यासाठी मंडळाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. विद्यार्थ्यांना विषयातील संकल्पना अधिक सुस्पष्टपणे समजाव्यात, त्यांना स्वयंअध्ययन करता यावे तसेच परीक्षेची प्रभावी तयारी करता यावी, या उद्देशाने महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाने के-स्किम अंतर्गत निवडक विषयांसाठी व्हिडिओ व्याख्याने आणि विविध स्वरूपांतील डिजिटल अध्ययन साहित्य विकसित करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.

या उपक्रमांतर्गत ई-ट्युटोरियल्स, द्विभाषिक ई-कंटेंट, प्रयोगशाळा हस्तपुस्तिका, व्हिडिओ व्याख्याने, सादरीकरणे तसेच मार्गदर्शक वाचन साहित्य अशा विविध स्वरूपांतील डिजिटल अध्ययन संसाधनांची टप्प्याटप्प्याने निर्मिती करण्यात येणार आहे. या साहित्यामुळे विद्यार्थ्यांना वर्गातील अध्यापन अधिक प्रभावीपणे समजून घेणे, स्वयंअध्ययन व उजळणी करणे तसेच परीक्षेची तयारी करणे सुलभ होणार आहे.