
वांद्रे व खार परिसरातील विविध गणेश मंडळांना भेट देऊन विभागीय संपर्क अधिकारी व संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे, प्रक्रिया आणि उपलब्ध सेवांची माहिती दिली. उत्सवाच्या व्यासपीठाचा प्रभावी वापर करून नागरिकांच्या प्रश्नांवर प्रत्यक्ष मार्गदर्शन करण्यात आले. समाजकल्याण, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, महसूल आदी विभागांच्या समन्वयातून हा उपक्रम राबविण्यात आला.

लोकसंवाद उपक्रमादरम्यान २९ सप्टेंबर २०२६ रोजी मुंबई उपनगर जिल्ह्यात आयोजित करण्यात येणाऱ्या ‘रोजगार महाकुंभ मेळाव्या’ची माहितीही युवकांना देण्यात आली. रोजगाराच्या संधी, कौशल्य विकास व उद्योजकतेशी संबंधित उपलब्ध संधींचा लाभ घेण्यासाठी युवकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले. गणेशोत्सवाच्या उत्सवी वातावरणाला शासकीय योजनांच्या जनजागृतीची जोड देत ‘लोकसंवाद २०२६’च्या माध्यमातून शासन आणि नागरिकांमधील संवाद अधिक व्यापक करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.