
ठाणे (28) : आयएडीव्हीएल (IADVL) महाराष्ट्र मुंबई शाखेतर्फे दिनांक 21 जून 2026 रोजी आयोजित करण्यात आलेल्या इम्युनोडर्मेटोलॉजी परिषदेत राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय कळवा येथील त्वचारोग, गुप्तरोग व कुष्ठरोग विभागाने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या परिषदेतील ई पोस्टर सादरीकरणासाठी राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या या कामगिरीबद्दल महापौर शर्मिला पिंपळोलकर व आयुक्त सौरभ राव यांनी सर्वांचे अभिनंदन केले आहे.
विभागप्रमुख डॉ. प्रज्ञा जोशी यांनी “कनेक्टिव्ह टिश्यू डिसऑर्डर्सच्या लवकर निदानामध्ये नेलफोल्ड कॅपिलरोस्कोपीचे महत्त्व” या विषयावर मार्गदर्शक असे व्याख्यान दिले. नेल फोल्ड कॅपिलॅरोस्कोपी ही नखांच्या मुळाजवळील सूक्ष्म रक्तवाहिन्यांची वेदनारहित आणि सोपी तपासणी आहे. या तपासणीमुळे स्क्लेरोडर्मा व इतर कनेक्टिव्ह टिश्यू विकारांचे लवकर निदान करण्यात मदत होते. रक्तवाहिन्यांमधील बदल पाहून आजाराची तीव्रता आणि भविष्यातील गुंतागुंतींचा अंदाज घेता येतो. कनेक्टिव्ह टिश्यूचे आजार हे गंभीर आजार असून त्यांचा शरीरातील अनेक अवयवांवर परिणाम होऊ शकतो. योग्य वेळी उपचार सुरू करून रुग्णांचे दीर्घकालीन आरोग्य आणि जीवनमान सुधारण्यास ही तपासणी उपयुक्त ठरते. त्यांच्या सादरीकरणातून विभागाची शैक्षणिक गुणवत्ता, संशोधनात्मक दृष्टीकोन आणि त्वचारोग क्षेत्रातील ज्ञानवृद्धी व उत्कृष्ट वैद्यकीय सेवांप्रती असलेली बांधिलकी अधोरेखित झाली.
याशिवाय, विभागाच्या वरिष्ठ निवासी. बस्मा बशीर यांना त्यांच्या “Co-existence of Two Acantholytic Disorders: Pemphigus Foliaceus in a Patient with Darier Disease” या विषयावरील ई-पोस्टर सादरीकरणासाठी दुसर्या क्रमांकाचे पारितोषिक प्रदान करण्यात आले. Pemphigus Foliaceus आणि Darier’s Disease यांचे सहअस्तित्व अत्यंत दुर्मिळ आहे. दोन्ही रोगांमध्ये त्वचेच्या पेशींमधील चिकटपणा (acantholysis) कमी होण्याचे साम्य असते. त्यामुळे निदानात गोंधळ होऊ शकतो, म्हणून क्लिनिकल तपासणी, बायोप्सी आणि इम्युनोफ्लुरेसन्स चाचण्या आवश्यक असतात.हा अभ्यास त्वचारोगविषयक वैद्यकीय साहित्यात महत्त्वपूर्ण योगदान मानले जात आहे.
या उल्लेखनीय यशामुळे राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाला राज्यस्तरीय व्यासपीठावर मान्यता व गौरव प्राप्त झाला असून, त्वचारोगशास्त्र क्षेत्रातील संस्थेचे वाढते योगदान आणि शैक्षणिक उत्कृष्टता पुन्हा एकदा अधोरेखित झाली असल्याचे रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिष्ठात्री डॉ. स्वप्नाली कदम यांनी नमूद केले.