
ठाणे महापालिका क्षेत्रातील नागरिकांना मालमत्ता कर वेळेत भरण्यास प्रोत्साहन देण्यासाठी देण्यात येणाऱ्या 10 टक्के सवलत योजनेस आता 30 जून 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यापूर्वी 15 जून 2026 पर्यंत सवलत योजना ठेवण्यात आली होती. परंतु नागरिकांच्या मागणी लक्षात घेवून महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी मुदतवाढ देण्याच्या सूचना प्रशासनास दिल्या होत्या. त्यानुसार महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी या मुदतवाढीस मंजुरी दिली आहे. त्यामुळे 10 टक्के सवलत योजनेच्या मुदतवाढीमुळे करदात्यांना दिलासा मिळाला आहे.
ठाणे महापालिकेच्या मालमत्ता कर विभागामार्फत दरवर्षी अशा करदात्यांना विशेष सवलत देण्यात येते, जे पहिल्या सहामाहीच्या करासह दुसऱ्या सहामाहीचा कर एकत्रित दि. 1 एप्रिल 2026 ते 15 जून 2026 या कालावधीत भरतील अशा करदात्यांना दुसऱ्या सहामाहीतील सामान्य करावर 10 टक्के सवलत देण्याची योजना राबविण्यात आली होती.
मात्र यंदा राज्यभरात उष्णतेची तीव्र लाट अनुभवास येत असून नागरिकांना अभूतपूर्व उकाड्याचा सामना करावा लागत आहे. प्रखर उन्हामुळे अनेक नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळले, तर काही नागरिक सुट्टीसाठी गावी गेले होते. याशिवाय काही भागांमध्ये वीज पुरवठा खंडित होणे, इंटरनेट सेवा विस्कळीत होणे अशा कारणांमुळे अनेक करदात्यांना निर्धारित मुदतीत मालमत्ता कर भरता आला नाही. परिणामी त्यांना 10 टक्के सवलत योजनेचा लाभ घेण्याची संधी गमवावी लागली.
या पार्श्वभूमीवर ठाणे शहरातील विविध प्रभागांतील नागरिकांनी महापालिकेकडे सवलत योजनेची मुदत वाढवून देण्याची मागणी केली होती. नागरिकांच्या या मागणीची दखल घेत महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी प्रशासनाला मुदतवाढ देण्याबाबत सूचना दिल्या. त्यानुसार आयुक्त सौरभ राव यांनी सदर योजनेस 30 जून 2026 पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. या मुदतवाढीमुळे जास्तीत जास्त नागरिकांना 10 टक्के सवलतीचा लाभ घेता येणार असून महापालिकेच्या महसूल वसुलीलाही चालना मिळणार आहे.
महापालिकेच्या प्रभाग समिती स्तरावरील सर्व संकलन केंद्रांवर कार्यालयीन दिवशी सकाळी 10.30 ते सायंकाळी 5.00 या वेळेत तसेच सर्व शनिवारी सकाळी 10.30 ते दुपारी 4.00 या वेळेत कर भरता येणार आहे. तसेच महापालिकेच्या www.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने कर भरण्याची सुविधा उपलब्ध असून Google Pay, PhonePe, Paytm आणि BHIM अॅपद्वारेही सुलभतेने कर जमा करु शकतील. करदात्यांना कराचे देयक पाहणे व कर भरणे सुलभ व्हावे यासाकरिता +912225331590 या WhatsApp, Chatbot ही प्रणाली ठाणे महापालिकेने कार्यान्वित केली असून, करदाते याद्वारे देखील सुलभतेने कर जमा करु शकतील.
महापालिका प्रशासनाने नागरिकांना मुदतवाढीचा लाभ घेत मालमत्ता कर वेळेत भरावा आणि उपलब्ध सवलतीचा फायदा करून घ्यावा, असे आवाहन केले आहे. नागरिकांनी ऑनलाइन तसेच महापालिकेच्या कर संकलन केंद्रांमार्फत कर भरून या योजनेचा लाभ घ्यावा, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.