
ज्येष्ठ दिग्दर्शक राजन ताम्हाणे, प्रा. डॉ.प्रदीप ढवळ यांनी पत्रकार परिषदेत केली घोषणा
गंधार बालकलाकार पुरस्कार श्रीजय देशपांडे याला
ठाणे : मराठी नाट्य सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक विजय केंकरे यांना यंदाचा गंधार गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार सोहळा बाल दिनाच्या औचित्य साधून १४ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी १० वा. गडकरी रंगायतन येथे आयोजित करण्यात येणार आहे अशी माहिती ज्येष्ठ दिग्दर्शक, अभिनेते राजन ताम्हाणे
आणि ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. प्रदीप ढवळ यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
या पुरस्काराचे स्वरूप शाल श्रीफळ सन्मानचिन्ह 11, 111 रुपये रोख असे आहे. तसेच, तीन वर्षांपूर्वी पासून गंधार बालकलाकार पुरस्कार सुरू केला असून यंदाचा पुरस्कार श्रीजय देशपांडे याला देण्यात येणार आहे.
गंधार या बालनाट्य संस्थेच्यावतीने गंधार गौरव सोहळ्याचे दरवर्षी आयोजन केले जाते. यंदाचे हे ११ वे वर्षे आहे. ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी, विद्या पटवर्धन, दिलीप प्रभावळकर, अशोक समेळ, नरेंद्र आंगणे, अतुल परचुरे, सचिन पिळगावकर, महेश कोठारे, विजय गोखले,

गेल्यावर्षी निवेदिता सराफ यांना आतापर्यंत गंधार गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यंदाचा हा पुरस्कार ज्येष्ठ दिग्दर्शक विजय केंकरे यांना देण्यात येत आहे. मे महिन्यात गंधारतर्फे विविध जिल्ह्यांत गंधार गौरव बालनाट्य स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेसाठी ठाणे, मुंबई, नाशिक, पुणे येथून प्रवेश आले होते. या स्पर्धेसाठी भालचंद्र कुबल आणि चंद्रशेखर पाटील यांनी परीक्षण केले होते. २३ बालनाट्यांनी यात प्रवेश घेतला होता. या स्पर्धेतील नामांकने देखील आज जाहीर करण्यात आली. या पत्रकार परिषदेला गंधारचे प्रा. मंदार टिल्लू, सुनील जोशी, अमोल आपटे, वैभव पटवर्धन, पी. एन. पाटील, चंद्रकांत थोरात, संतोष गावडे, पल्लवी टिल्लू आदी उपस्थित होते.
————————————————————
यंदाच्या युवा पुरस्काराचे मानकरी
१ साजिरी जोशी
२ आकाश सूर्यवंशी
३. संग्राम समेळ
———————————————————–
बालनाट्य संस्था पुरस्कार यावर्षी कलाकेंद्र, पुणे (संस्था प्रमुख संतोष माकुडे) या संस्थेला देण्यात येणार आहे. दरवर्षी एकांकिका आयोजन करणाऱ्या आयोजन समितीला देखील पुरस्कार दिला जाणार आहे यामध्ये महाराष्ट्रीय कालोपासक (पुरुषोत्तम करंडक) पुणे, कार्यरत्न पुरस्कार डॉ. जे. बी. भोर आणि लक्षवेधी बालनाट्य माकडचाळे (निर्माते प्रशांत निगडे) यांना पुरस्कार देण्यात येणार आहे.