
उच्च शिक्षणाचा उद्देश केवळ पदवी देणे नसून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करून त्यांना स्वावलंबी आणि देशाच्या विकासात योगदान देणारे सुजाण नागरिक बनविणे हा आहे. महाराष्ट्राला शिक्षण, संशोधन आणि नवोपक्रमांचे जागतिक केंद्र बनविण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन मंत्री पाटील यांनी केले.
विकसितभारत२०४७ च्या संकल्पनेनुसार महाराष्ट्रातील उच्च शिक्षणाची गुणवत्ता, संशोधन, नवोपक्रम आणि उद्योगाभिमुख शिक्षणाला चालना देऊन रोजगाराच्या संधी वाढविण्यावर भर आहे. जागतिक स्तरावरील विद्यार्थी व संशोधकांना आकर्षित करणारे शिक्षण केंद्र म्हणून महाराष्ट्राची ओळख निर्माण करणे हे शासनाचे उद्दिष्ट आहे, असे मंत्री पाटील म्हणाले.
परिषदेत उच्च शिक्षणाची गुणवत्ता, कौशल्य विकास, उद्योगांच्या गरजांनुसार कुशल मनुष्यबळ निर्मिती, संशोधन, रोजगारनिर्मिती आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य यावर धोरणात्मक चर्चा होणार आहे. शिक्षणसंस्था, उद्योग क्षेत्र आणि तज्ज्ञांना एकाच व्यासपीठावर आणून सर्वोत्तम कार्यपद्धती व विचारांची देवाणघेवाण करण्यावर या परिषदेचा भर असल्याचे अपर मुख्य सचिव बी. वेणूगोपाल रेड्डी यांनी सांगितले.
यावेळी राज्यमंत्री इंद्रनील नाईक, (दूरदृष्य प्रणालीद्वारे) उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणूगोपाल रेड्डी, सीईटी आयुक्त दिलीप सरदेसाई, उच्च शिक्षण संचालक शैलेंद्र देवळाणकर, तंत्र शिक्षण संचालक प्रमोद नाईक, एलेट्स टेक्नोमीडियाचे संस्थापक डॉ. रवी गुप्ता, राज्यातील विविध विद्यापीठांचे कुलगुरू उपस्थित होते.