
गणेशोत्सवाशी संबंधित परंपरा, संस्कार आणि पिढ्यान्पिढ्या जपलेल्या आठवणी जगासमोर आणण्यासाठी ‘Bappa.org’ हे डिजिटल व्यासपीठ महत्त्वाची भूमिका बजावेल, असे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी सांगितले.
‘Bappa.org’ आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या सहकार्याने आयोजित ‘बाप्पाचा कट्टा’ या ९० दिवसांच्या सांस्कृतिक उपक्रमाचा शुभारंभ मुंबईतील बँडस्टँड येथे झाला. यावेळी अभिनेते अमेय वाघ, चित्रपट निर्माते, लेखक व अभिनेते निपुण धर्माधिकारी, ‘बाप्पा डॉट ओआरजी’चे संस्थापक व ई-फ्लॅगचे संस्थापक आणि मॅनेजिंग डायरेक्टर श्रीपाद अष्टेकर उपस्थित होते.

गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव नसून कला, संस्कृती, सामाजिक एकोपा आणि राष्ट्रीय भावनेचे प्रतीक आहे. या उत्सवाचा सांस्कृतिक वारसा जागतिक स्तरावर पोहोचवणे आवश्यक असल्याचे मंत्री ॲड. शेलार यांनी नमूद केले.
नागरिकांनी ‘Bappa.org’ या डिजिटल व्यासपीठावर गणेशोत्सवाशी संबंधित आपल्या आठवणी, कथा, छायाचित्रे आणि प्रथा-परंपरांची माहिती नोंदवावी. या माध्यमातून गणेशोत्सवाच्या ऐतिहासिक व सांस्कृतिक वारशाचे डिजिटल दस्तऐवजीकरण करण्यात येणार आहे. उपक्रमात सहभागी होणाऱ्या नागरिकांना राज्य शासनाच्या वतीने मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीचे डिजिटल ‘कल्चरल प्रिझर्व्हर सर्टिफिकेट’ देण्यात येणार आहे.

‘बाप्पाचा कट्टा’अंतर्गत उखाणे, म्हणी, ओव्या, पारंपरिक खेळ आणि विविध कलांच्या स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत. ऑनलाइन प्राथमिक निवडीनंतर कलाकारांना प्रत्यक्ष सादरीकरणाची संधी मिळणार असून, विजेत्यांना पारितोषिके व करंडक देण्यात येतील. या उपक्रमामुळे महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचे जतन होऊन ती नव्या पिढीपर्यंत पोहोचण्यास मदत होईल.
अभिनेते निपुण धर्माधिकारी आणि अमेय वाघ यांनीही या उपक्रमातून संस्कृती व तंत्रज्ञानाचा संगम साधून महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा जगभर पोहोचवण्याचे आवाहन केले.
‘Bappa.org’चे संस्थापक श्रीपाद अष्टेकर यांनी नागरिकांनी व्हॉट्सॲपद्वारे या व्यासपीठाशी जोडून आपल्या कथा व आठवणी नोंदवाव्यात, असे सांगितले.