
दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक सभागृहात व्यंगचित्रकार प्रशांत कुलकर्णी संपादित आणि ग्रंथाली प्रकाशनतर्फे प्रकाशित ‘महाराष्ट्राच्या हास्यरेषा’ पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.
मनोगत व्यक्त करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, व्यंगचित्रकला ही एक अशी प्रभावी कला आहे, जिथे एकही शब्द न उच्चारता हवे तेवढे प्रभावी फटके मारता येतात आणि नेमके सांगायचे ते लोकांपर्यंत पोहोचवता येते. कोणत्याही काळातील घडामोडी असोत किंवा विरोधाभास असो, तो सातत्याने व्यंगचित्रांच्या माध्यमातून मांडण्याचे काम मराठी व्यंगचित्रकारांनी केले आहे. व्यंगचित्रांच्या माध्यमातून संपूर्ण व्यक्तिमत्वाचे दर्शन होते. ही एक विलक्षण कला आहे. जी महाराष्ट्राच्या मातीने आधीपासून जोपासली आहे. ही कला भावी पिढीपर्यंत नेण्यासाठी हे पुस्तक निश्चितच मोलाची भूमिका बजावणार आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुस्तकाचे महत्व अधोरेखित केले.

यावेळी सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज ठाकरे, ग्रंथाली प्रकाशनचे विश्वस्त सुदेश हिंगलासपूरकर, संपादक प्रशांत कुलकर्णी उपस्थित होते.