
सुखजीत स्टार्च कंपनीमार्फत चिचोंडी औद्योगिक क्षेत्रात हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारण्यात येणार असून, या प्रकल्पासंदर्भात अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक झाली.
या प्रकल्पासाठी सुमारे १२५ एकर जमीन तसेच आवश्यक असलेला पाणीपुरवठा आणि वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी उद्योग विभागाकडून आवश्यक ते सहकार्य करण्यास संमती देण्यात आली आहे. तसेच, संबंधित सर्व विभागांनी समन्वयाने आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करण्याचे निर्देश बैठकीत देण्यात आले. सुखजीत स्टार्च लि. यांचा उद्योग लवकर सुरू होण्यासाठी उद्योग विभाग आणि संबंधित कंपनीने सामंजस्य करार करून पुढील कार्यवाही तातडीने करावी, असे मंत्री भुजबळ यांनी सांगितले.
या बैठकीस आमदार पंकज भुजबळ, महाराष्ट्र इन्स्टिट्युशन फॉर ट्रान्सफॉर्मेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रविण परदेशी, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. पी. अनबळगन, जलसंपदा विभागाचे सचिव प्रकाश मिसाळ, एमआयडीसीचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, उद्योग विभागाचे अतिरिक्त आयुक्त बाबासाहेब यशवंते, उद्योग उपसचिव आबासाहेब कवळे यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.