
येत्या काळात महाराष्ट्र देशातील प्रमुख ईव्ही निर्मिती केंद्र बनेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात ईकेए मोबिलिटी आणि पिनॅकल समूहाच्या सहा नवीन उत्पादन सुविधांच्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त केला.
यावेळी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय अवजड उद्योग व पोलाद मंत्री एच. डी. कुमारस्वामी, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, केंद्रीय नागरी विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ उपस्थित होते.

इलेक्ट्रिक वाहनांमुळे प्रदूषण आणि जीवाश्म इंधनावरील आयात कमी होण्यास मदत होणार आहे. आगामी तीन वर्षांत महाराष्ट्राला ५० हजार इलेक्ट्रिक बसची आवश्यकता असून, ही मागणी पूर्ण करण्यासाठी राज्यातील उद्योगांनी उत्पादन क्षमता वाढवावी, असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.
इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढविण्यासाठी हरित ऊर्जेचा वापर आणि महामार्गांवरील चार्जिंग सुविधांचे जाळे विकसित करण्यात येणार असून, त्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा व किफायतशीर दरात वीज उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न राज्य शासन करेल. पिनॅकल समूहाच्या एका उत्पादन सुविधेत ५० टक्के महिला कर्मचारी कार्यरत असून, त्यांना विशेष प्रशिक्षणाद्वारे रोजगाराची संधी देण्यात आली आहे. नव्या उत्पादन सुविधांमुळे राज्यातील ईव्ही निर्मिती आणि रोजगारनिर्मितीला चालना मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.
ऑटोमोबाईल उद्योगाने इलेक्ट्रिक वाहने, ट्रक आणि बस निर्मितीच्या माध्यमातून जागतिक स्तरावर नेतृत्वाचे उद्दिष्ट ठेवावे. जीवाश्म इंधनावरील आयात कमी करण्यासाठी पर्यायी इंधने, जैवइंधन, इथेनॉल आणि हायड्रोजनच्या वापरासह बॅटरी तंत्रज्ञान, संशोधन व स्वदेशी नवकल्पनांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. चार्जिंग सुविधा आणि उत्पादन क्षमता वाढविण्यावरही भर द्यावा. शेतकऱ्यांनी अन्नदात्यासोबतच ऊर्जादाता व इंधनदाताही व्हावे. स्वदेशी तंत्रज्ञानाच्या बळावर भारताने आत्मनिर्भर होत जागतिक बाजारपेठेत नेतृत्व करावे, असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

भक्कम औद्योगिक पायाभूत सुविधा आणि कुशल मनुष्यबळामुळे महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय गुंतवणुकीसाठी पसंतीचे केंद्र ठरत आहे. ‘व्हीडीएल ग्रुप’ आणि ‘पिनॅकल इंडस्ट्रीज’ यांच्या संयुक्त उपक्रमातून तयार होणाऱ्या इलेक्ट्रिक बसेसमुळे पुणे व मुंबईतील पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतुकीला चालना मिळेल. तसेच पुण्यातील पाच उत्पादन प्रकल्पांमधून हजारो रोजगारनिर्मिती होत असून, महिलांना समान संधी आणि तरुणांना आधुनिक कौशल्य प्रशिक्षण देण्यावर उद्योगांनी भर द्यावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी केले.
कंपनीचे संस्थापक व अध्यक्ष डॉ. सुधीर मेहता यांनी प्रास्ताविकात उद्योग समूहाची वाटचाल, औद्योगिक क्षेत्रातील योगदान आणि भविष्यातील विस्तार योजनांची माहिती दिली. तसेच केंद्र व राज्य शासनाकडून मिळणाऱ्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले. यावेळी विविध उद्योग समूहांचे प्रतिनिधी, उद्योजक आणि नागरिक उपस्थित होते.