
ठाण्यातील मेसर्स हायस्ट्रीट इम्पेक्स एलएलपी आणि मावळ तालुक्यातील मेसर्स सोएक्स इंडिया प्रा. लि. या कंपन्यांवरील कारवाईच्या अनुषंगाने ही कार्यवाही करण्यात आल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिली.
अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या चौकशीनंतर अन्न सह आयुक्त दिगंबर भोगावडे, अन्न सहायक आयुक्त यदुराज दहातोंडे, अन्न सुरक्षा अधिकारी अशोक इलागेर आणि सी. आर. स्वामी या चार अधिकाऱ्यांना ३० ऑक्टोबर २०२६ रोजीच्या आदेशानुसार निलंबित करण्यात आले आहे. महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ मधील नियम ८ अन्वये पुढील विभागीय चौकशीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
हायस्ट्रीट इम्पेक्स एलएलपी प्रकरणात उत्पादनावर ‘नॉट फॉर एडिबल यूज/ओन्ली फॉर यूज इन हुक्का फॉर स्मोकिंग पर्पज’ असे नमूद असतानाही अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली. या कारवाईसाठी अधिकाऱ्यांवर दबाव आणल्याचा, तसेच कारवाईस नकार देणारे सहायक आयुक्त पी. पी. सूर्यवंशी यांना कारणे दाखवा नोटीस बजावल्याचा उल्लेख चौकशी अहवालात आहे.
मावळ तालुक्यातील टाकवे येथील सोएक्स इंडिया प्रा. लि. कंपनीवर २ जानेवारी २०२६ रोजी करण्यात आलेल्या कारवाईत ३१ कोटी ६७ लाख २१ हजार ९८७ रुपये किमतीचा, ५ लाख ४८ हजार ४८८ किलो वजनाचा प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त करून कंपनीचे आस्थापन सील करण्यात आले होते.
या दोन्ही प्रकरणांमध्ये संबंधित अधिकाऱ्यांची भूमिका, कारवाईची कायदेशीर वैधता, अधिकारक्षेत्र आणि प्रशासकीय प्रक्रियेचे पालन यांची विभागीय चौकशीद्वारे तपासणी करण्यात येणार आहे. अन्न सुरक्षा आणि सार्वजनिक आरोग्याशी संबंधित कारवाईत कायद्याचे पालन व प्रशासकीय उत्तरदायित्वाला प्राधान्य दिले जाईल, असे मंत्री नरहरी झिरवाळ यांनी स्पष्ट केले.