
महाराष्ट्र विधिमंडळासाठी ही अभिमानास्पद बाब असून, या नियुक्तीबद्दल विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, उपसभापती सचिन अहिर आणि विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी त्यांचे अभिनंदन केले.
लंडन येथील संस्थेच्या मुख्यालयाचे उपमहासचिव जार्विस मातिया यांनी २० ऑक्टोबर २०२६ रोजी पत्राद्वारे ॲड. नार्वेकर यांचे अभिनंदन व स्वागत केले. केपटाऊन येथे झालेल्या राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या सर्वसाधारण सभेपूर्वी त्यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब झाले होते.
राष्ट्रकुल संसदीय मंडळ ही लोकशाही मूल्यांचे संवर्धन, संसदीय कार्यपद्धतींची देवाणघेवाण आणि सुशासनाला प्रोत्साहन देणारी आंतरराष्ट्रीय संस्था आहे. या नियुक्तीमुळे महाराष्ट्र विधिमंडळाला आंतरराष्ट्रीय संसदीय सहकार्य, उत्तम कार्यपद्धतींची देवाणघेवाण आणि लोकशाही संस्था अधिक सक्षम करण्यासाठी योगदान देण्याची संधी मिळणार आहे.
दरम्यान, राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या आंतरराष्ट्रीय कार्यकारी समितीतील विभागीय प्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांची परिचयात्मक बैठक ५ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ८ वाजता (जीएमटी) आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत सदस्यांच्या भूमिका, जबाबदाऱ्या आणि संस्थेच्या प्रशासकीय कार्यचौकटीबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.