
योग अधिक संतुलित, जागरूक आणि निरोगी जीवन जगण्याचे प्रभावी माध्यम आहे, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी केले.
पुण्यातील कैवल्यधाम येथील ‘गोर्धनदास सेकसरिया कॉलेज ऑफ योग अँड कल्चरल सिंथेसिस’च्या अमृत महोत्सव समारंभास राज्यपाल जिष्णु देव वर्मा, माजी केंद्रीय मंत्री तथा कैवल्यधाम ग्लोबलचे अध्यक्ष सुरेश प्रभू, कैवल्यधामचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुबोध तिवारी, राकेश सेकसरिया आदी उपस्थित होते.

आजच्या तणावपूर्ण जीवनशैलीत योग व्यक्तीला थांबण्याची, विचार करण्याची, श्वासावर लक्ष केंद्रित करण्याची आणि स्वतःशी पुन्हा जोडले जाण्याची संधी देतो. मन आणि शरीरातील संतुलन तसेच एकाग्रता वाढविण्यासाठी योग उपयुक्त ठरतो. महर्षी पतंजलींचे सूत्र आजच्या माहितीच्या सततच्या प्रवाहाच्या काळातही महत्त्वपूर्ण असल्याचे उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी सांगितले.
योगाची जागतिक स्तरावर वाढती लोकप्रियता लक्षात घेता, भारताने योगाचे मूलभूत ज्ञान, वैज्ञानिकता आणि त्याच्या मूळ तत्त्वज्ञानाशी असलेले नाते जपणे आवश्यक आहे. योगाच्या माध्यमातून शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक संतुलन आणि सर्वांगीण आरोग्याला चालना मिळू शकते, असे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी सांगितले.