
परंपरा आणि आधुनिकता यांचा समन्वय साधत विकासाकडे वाटचाल करताना समृद्ध सांस्कृतिक वारसा, भाषा, कला, परंपरा आणि मूल्यांचे जतन करणे आवश्यक आहे. आधुनिक पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान आणि आर्थिक विकासासोबत सांस्कृतिक मुळांशी नाते दृढ ठेवणे ही विकसित भारताची खरी ओळख आहे, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी केले.

पुणे फेस्टिवलने कला, संस्कृती, संगीत, नृत्य, साहित्य, क्रीडा आणि पर्यटन क्षेत्राला एकत्र आणत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगळी ओळख निर्माण केली आहे. विविध देशांतील कलाकार, पर्यटक, प्रतिनिधी आणि विद्यार्थ्यांच्या सहभागातून सांस्कृतिक देवाणघेवाणीला चालना मिळते. यंदाच्या महोत्सवात २१ देशांतील विद्यार्थी सहभागी झाले. विविध श्रद्धा, संस्कृती आणि परंपरांचा आदर ही भारताच्या सांस्कृतिक जीवनाची वैशिष्ट्ये असल्याचे उपराष्ट्रपती राधाकृष्णन यांनी नमूद केले.
पर्यटन हे आर्थिक विकासाचे महत्त्वाचे साधन असून महाराष्ट्रातील सांस्कृतिक पर्यटनाला जागतिक स्तरावर चालना देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. पुणे फेस्टिव्हलला भविष्यात आणखी विस्तार देऊन जागतिक सांस्कृतिक महोत्सव म्हणून विकसित करण्याची मोठी क्षमता असल्याचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी सांगितले.

मोठ्या कलाकारांसोबत नवोदित कलाकारांना संधी देणे, महिला महोत्सव, लावणी महोत्सव, चित्रकला, नृत्य, पाककला, मेहंदी तसेच विविध स्पर्धांचे आयोजन आणि आंतरराष्ट्रीय सहभाग हे पुणे फेस्टिवलचे वैशिष्ट्य असल्याचे उपमुख्यमंत्री श्रीमती पवार यांनी सांगितले.
यावेळी उपराष्ट्रपती राधाकृष्णन यांच्या हस्ते ज्येष्ठ कलाकार मोहन जोशी यांना ‘पुणे फेस्टिवल जीवन गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.