
महाराष्ट्राची व्यावसायिक क्षमता, कुशल मनुष्यबळ, सुरक्षित औद्योगिक वातावरण आणि उद्योजकतेची परंपरा यांच्या बळावर राज्याला जागतिक दागिने उत्पादन व निर्यातीचे प्रमुख केंद्र बनविण्याची संधी या प्रकल्पामुळे उपलब्ध होईल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, वनमंत्री गणेश नाईक, आमदार मंदाताई म्हात्रे, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. पी. अन्बलगन, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेंद्र कुशवाह, रत्न व आभूषण निर्यात प्रोत्साहन परिषदेचे अध्यक्ष किरीट भन्साळी उपस्थित होते.

महापे येथील २२ एकर क्षेत्रावर अत्याधुनिक दागिने उत्पादन केंद्र विकसित करण्यात येत आहे. बदलत्या जागतिक व्यापार परिस्थितीशी जुळवून घेत आधुनिक तंत्रज्ञान, उत्पादनातील नावीन्य आणि निर्यातीच्या नव्या संधींचा स्वीकार करणे आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले. प्रकल्पाच्या उभारणीसाठी वीज, पाणी, रस्ते, पायाभूत सुविधा आणि विविध विभागांच्या परवानग्या वेळेत उपलब्ध करून देण्यास शासन कटिबद्ध असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या २०४७ पर्यंत विकसित भारत घडविण्याच्या संकल्पपूर्तीत उत्पादन, निर्यात, रोजगारनिर्मिती आणि उद्योजकतेची भूमिका महत्त्वाची आहे. महाराष्ट्राला एक ट्रिलियन अमेरिकी डॉलर अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दिशेने इंडिया ज्वेलरी पार्कसारखे प्रकल्प महत्त्वपूर्ण योगदान देतील, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.

नवीमुंबई महापे येथे उभारण्यात येणाऱ्या इंडियाज्वेलरीपार्क प्रकल्पातून २५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आणि एक लाख रोजगारांच्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
२२ एकर क्षेत्रावर विकसित होणाऱ्या या प्रकल्पात दोन हजारांहून अधिक उत्पादन युनिट्स सामावून घेण्याचे उद्दिष्ट असून, महाराष्ट्राला जागतिक रत्न व आभूषण उत्पादन आणि निर्यातीचे प्रमुख केंद्र बनविण्यास यामुळे चालना मिळेल. राज्याच्या जेम्स अँड ज्वेलरी धोरणांतर्गत एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित करणे, पाच लाख रोजगार निर्माण करणे आणि निर्यात दुप्पट करण्याचे उद्दिष्ट आहे. प्रकल्पासाठी आवश्यक पायाभूत सुविधा व प्रशासकीय सहकार्य शासनाकडून उपलब्ध करून दिले जाईल, अशी ग्वाहीही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी रत्न व आभूषण निर्यात प्रोत्साहन परिषदेचे अध्यक्ष किरीट भन्साळी यांनी प्रकल्पाची पार्श्वभूमी आणि उद्योगाच्या विकासातील त्याचे महत्त्व विशद केले.