
पनवेल तालुक्यातील शिरढोण येथे नैना क्षेत्रातील विकासकामांचे भूमिपूजन, नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पूर्वेकडील जोडणीसाठी उभारण्यात आलेल्या एसबीआर-९, बीआर-४, बीआर-५ आणि उरण बायपास पुलांचे लोकार्पण तसेच भूधारकांना मालमत्ता पत्रकांचे वाटप मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, पालकमंत्री भरत गोगावले, जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर, खासदार श्रीरंग बारणे, खासदार सुनील तटकरे, अतुल पाटील उपस्थित होते.
नैना क्षेत्राचा एकात्मिक विकास आराखडा आणि नगररचना योजनांच्या माध्यमातून नियोजनबद्ध व कालबद्ध विकास करण्यात येत आहे. भूधारकांच्या जमिनीशी संबंधित कागदपत्रे, मालकी नोंदी आणि मोजणीची प्रक्रिया पूर्ण करून त्यांच्या प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.

या क्षेत्रात एज्युसिटी, मेडिसिटी, स्पोर्ट्स सिटी, एरोसिटी आणि नॉलेज सिटी यांसारख्या संकल्पनांच्या माध्यमातून रोजगार, शिक्षण, आरोग्य आणि आर्थिक विकासाच्या नव्या संधी निर्माण होणार आहेत. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगड आणि पालघर परिसराच्या विकासाला चालना देणारा हा प्रकल्प भूमिपुत्रांच्या हिताचे संरक्षण करून राबविण्यात येईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
नैना क्षेत्रातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावून विकासाला गती देण्यात येणार असून, भूमिपुत्रांना विकासाचे भागीदार बनवून न्याय व रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येतील, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. जमीनधारकांसाठी विकास शुल्क आणि बेटरमेंट चार्ज शून्य करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, फ्रीहोल्डसंदर्भातील कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे. पुढील २५ ते ५० वर्षांच्या गरजा लक्षात घेऊन नैना क्षेत्राचे नियोजन करण्यात आले असून, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, अटल सेतू तसेच सक्षम रस्ते व मेट्रो जोडणीच्या माध्यमातून हा परिसर महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाचे महत्त्वपूर्ण केंद्र म्हणून विकसित करण्यात येणार आहे.
नैना क्षेत्रातील पायाभूत सुविधा आणि विमानतळ जोडणी प्रकल्पांमुळे उद्योग, व्यापार, सेवा व पर्यटन क्षेत्राला चालना मिळून स्थानिक तरुणांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील, असे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी सांगितले. सुमारे ९५३ कोटी रुपये खर्चाच्या एसबीआर-९, बीआर-४ व बीआर-५ प्रकल्पांमुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाणारी वाहतूक अधिक वेगवान होणार असून, ५० कोटी रुपये खर्चाच्या उरण बायपासमुळे वाहतूक कोंडी कमी होऊन प्रवास सुलभ होईल. अटल सेतू, उलवे कोस्टल रोड आणि अन्य जोडरस्त्यांमुळे नवी मुंबई व रायगड परिसराच्या आर्थिक विकासाला चालना मिळेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री पवार यांनी व्यक्त केला.
यावेळी नांदगावचे राजाराम पाटील, रामचंद्र भोईर, नामदेव भोईर, देवेंद्र भगत, धनाजी खुटले तर देवदगावचे जगदीश वाघमारे, गणेश गायकर, वामन वाघमारे, निलेश वाघमारे, विनोद वाघमारे या स्थानिक भूमिपुत्र भूधारकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मालमत्ता पत्रकांचे वितरण करण्यात आले.
प्रकल्पाविषयी माहिती
उरण शहरातील वाहतूक कोंडी कमी करून प्रवासाचा वेळ वाचविण्यासाठी सिडकोच्या वतीने द्रोणागिरी परिसरातील हॉटेल आनंदी ते उरण शहरादरम्यान ५०.२६ कोटी रुपये खर्चून ९४१ मीटर लांबीचा बायपास पूल उभारण्यात आला आहे. ११ मीटर रुंदीच्या या पुलामुळे स्थानिक नागरिक, मच्छीमार, शेतकरी आणि प्रवाशांचा प्रवास अधिक सुलभ व जलद होणार आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला पूर्वेकडून जलद व थेट जोडणी देण्यासाठी ९५३ कोटी रुपये खर्चाचे एसबीआर-९, बीआर-४ आणि बीआर-५ हे तीन महत्त्वपूर्ण पूल उभारण्यात आले आहेत. पनवेल खाडीवरील या पुलांमुळे पुणे, पनवेल, ठाणे आणि कल्याण परिसरातून राष्ट्रीय महामार्ग ४बीमार्गे विमानतळ, उलवे किनारी मार्ग, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (एमटीएचएल) आणि अमरा मार्गाशी संपर्क अधिक सुलभ होणार आहे. दोन्ही दिशांना प्रत्येकी चार मार्गिका आणि स्वतंत्र सेवा रस्ते, तसेच क्लोव्हरलीफ इंटरचेंजमुळे वाहतूक अधिक सुरळीत होऊन प्रवासाचा वेळ कमी होण्यास मदत होणार आहे.