
थायलंडच्या महावाणिज्यदूत सिरिपरन सुपनिलमीतविसेतकुल यांनी सह्याद्री अतिथिगृह येथे त्यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी महाराष्ट्रातील कृषी उत्पादनांच्या क्षमतेचा उपयोग करून थायलंडच्या कृषी-प्रक्रिया उद्योगांशी सहकार्य वाढविणे, तसेच लिंबू, डाळिंब आणि अन्य फळे-भाजीपाल्याच्या व्यापाराला चालना देण्याबाबत चर्चा झाली.
महाराष्ट्रात गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या थाई कंपन्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी परस्पर संवाद वाढविण्यासह पर्यटन, विद्यार्थी देवाणघेवाण, हिंदी भाषा शिक्षण आणि हिंदी चित्रपटांचे थाई भाषेत डबिंग यांद्वारे सांस्कृतिक संबंध दृढ करण्यावरही भर देण्यात आला. थायलंडच्या राजकन्या सिरिवन्नवरी यांच्या नियोजित महाराष्ट्र दौऱ्याबाबत चर्चा करताना छत्रपती संभाजीनगर, अजिंठा-वेरूळ लेणी, मुंबईतील संग्रहालय आणि घारापुरी बेट या स्थळांचा दौऱ्यात समावेश करण्याची सूचना मंत्री रावल यांनी केली.